नळपाणी योजनेसाठी येत्या दोन दिवसात विज जोडणी द्या

सभापती अजिंक्य पाताडे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना

मालवण दि प्रतिनिधी मालोंड बेलाचीवाडी येथील लोकांना गेले दोन-तीन महिने पावसाचे पाणी प्यावे लागत आहे. वाडीसाठी बनविण्यात आलेल्या नळपाणी योजनेस वीज जोडणी न दिल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या नळपाणी योजनेस वीज जोडणी द्या अशा सूचना सभापती अजिंक्य पाताडे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना केली. मालवण येथील पंचायत समितीची मासिक सभा आज झाली. या सभेत सभापती पाताडे यांनी मालोंड बेलाचीवाडी येथील नळपाणी योजनेस महावितरणकडून वीज जोडणी न दिल्याने ग्रामस्थांना पावसाचे पाणी प्यावे लागत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. महावितरणकडून ग्रामपंचायतीस पथदिव्यांची बिले भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर नळपाणी योजनेस वीज जोडणी देऊ असे स्पष्ट केले. मात्र यामुळे ग्रामस्थांना नळपाणी योजना पूर्ण झाली असताना केवळ वीज जोडणीअभावी पावसाचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे महावितरणने तत्काळ लक्ष देत तत्काळ वीज जोडणी देण्याची सूचना सभापतींनी महावितरणच्या अधिकार्‍यांना केली. तारकर्ली खाडीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे तारकर्लीसह, देवबाग गावास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा अवैध वाळू उपसा तत्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी मधुरा चोपडेकर यांनी केली. याबाबत तहसीलदारांचे लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले. रेवंडीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारास या रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी माजी सभापती सोनाली कोदे यांनी केली. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकामच्या विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. तालुक्यात सध्या ताप, सर्दी, खोकल्याची साथ आहे. या पार्श्‍वभूमीवर संशयितांची आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेस दिल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी यावेळी दिली. ज्या शिक्षकांनी अद्याप लस घेतली नाही शिवाय जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सभापतींनी केले. आदीवासी, कातकरी समाज बांधवांसाठीही लसीकरणाची मोहिम राबविण्याची सूचना आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना करण्यात आल्या. तालुक्यातील ज्या शाळांना दगडी कुंपण नाहीत अशा शाळांना दगडी कुंपणासाठी प्रत्येक सदस्यांनी प्रस्ताव देण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी तालुक्यातील रस्ता दुतर्फा झाडी, खड्डेमय रस्त्यांबाबतही चर्चा करण्यात आली. सभागृहात उपस्थितांना महसूलच्या ई-पीक पाहणी अ‍ॅपची माहिती देत जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यत याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना गटविकास अधिकार्‍यांना केल्या.

You cannot copy content of this page