तालुका विधी सेवा व बार असोसिएशनचा उपक्रम
*⚡वेंगुर्ले ता.२२-:* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी सामान्य नागरिकांसाठी कायदेविषयक बाबींची माहिती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वेंगुर्ला बसस्थानक येथे सकाळी १० पासून वकील व विधी स्वयंसेवकांमार्फत लिगल अॅड क्लिनिक घेण्यात आले. या क्लिनिकला भेट देणा-या व्यक्तींना कायदेविषयक बाबी समाजावून सांगून मार्गदर्शन केले. तर मठ, तुळस व दाभोली येथेही कायदेविषयक शिबिरे घेण्यात आली. परुळे व आडेली ग्रामपंचायत येथे गुगल मिटद्वारे जनजागृती शिबिर, तसेच वेंगुर्ला बस स्टॅण्ड, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद व तहसिलदार कार्यालय येथे लघु चित्रफित नालसा डॉक्युमेंन्ट्री प्रोजेक्टरद्वारे दाखवून त्याद्वारे विधीसेवा जनजागृती करण्यात आली. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वेंगुर्ला न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील यांचे सहकार्य लाभले.
