बंधारा बनला शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन
*💫बांदा दि.१९-:* अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटात झालेले शेतीचे नुकसान पाहून खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने पावसाचे पाणी अडवून शेती तयार करण्यात बळीराजा मग्न आहे. रोणापाल रायचे वाकड येथे कलमाच्या ओहोळावर लघुपाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या 768 हजार घनमीटर पाण्याची क्षमता असलेल्या बंधाऱ्याला लोखंडी प्लेट घालून शेतकऱ्यांनी दीड हेक्टर जमिनीवर मिरची, चवळी, भुईमूग, मका, नाचणी आदी पिकांचे उत्पन्न घेण्यास तयार झाला आहे. एकंदरीत सदर बंधारा रोणापाल मधील शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन बनला आहे. रोणापाल शिवसेना शाखाप्रमुख मंगेश गावडे यांचे अथक प्रयत्न तसेच गावातील तळेवाडी व देऊळवाडीतील ग्रामस्थांनी मिळून सदर बंधाऱ्याचे पाणी अडविले. यावेळी कृष्णा नाईक, नारायण नाईक, नरेंद्र कानडे, सुर्यकांत पायनाईक, रघुनाथ गावडे, गौरेश भोगटे, देवेंद्र देऊलकर, प्रदिप नाईक, भिकाजी परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. रोणापाल रायीचे वाकड येथे कलमाच्या ओहोळावर गतवर्षी लघुपाटबंधारे विभागामार्फत पक्का बंधारा बांधण्यात आला. यावर्षी ग्रामस्थांनी लोखंडी प्लेट घालून पाणी अडवून मिरची, चवळी, भुईमूग, मका, नाचणी आदी पिकांचे उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. बंधाऱ्याच्या प्लेट घातल्यानंतर चार दिवसांत बंधारा पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहू लागला आहे. अतिवृष्टीत जरी मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असले तरी ती भरपाई आता बंधाऱ्याच्या पाण्यावर भरून काढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लघुपाटबंधारे अभियंता श्री.जोईल यांचेही सहकार्य लाभल्याचे शाखाप्रमुख मंगेश गावडे यांनी सांगितले.
