प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन सादर करीत वेधले लक्ष
*⚡कणकवली ता.२०-:* मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटणपासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथे प्रवासी वर्गासाठी तसेच येथील नागरिकांसाठी आवश्यक असलेली एस. टी. निवारा शेड न बांधल्यामुळे येथील ग्रामस्थांनी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देऊन एस टी बस थांबा निवारा शेड बांधून देण्याची मागणी केली. यावेळी नडगीवे बांबरवाडी येथील ३२ नागरिकांच्या सह्या असलेले लेखी निवेदन प्रांत अधिकारी कणकवली याना देण्यात आले.यावेळी नडगिवे बांबरवाडी येथील कार्यकर्ते रवींद्र आंबेरकर, रघुनाथ आंबेरकर,प्रमोद आंबेरकर, गोपीनाथ पाटील तसेच खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,संतोष पाटणकर,मंगेश गुरव,योगेश पाटणकर,महेंद्र गुरव ऋषी राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई – गोवा महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महामार्गाचे काम करत असताना खारेपाटण नडगीवे बांबरवाडी येथे पूर्वापार असलेला एस टी बस थांबा निवारा शेड पाडण्यात आला.व नवीन चौपदरीकरण रस्ता बनविण्यात आला. मात्र येथील नागरिक तथा प्रवाशी वर्गाची गरज असलेला एस टी बस थांबा प्रवासी निवारा शेड पुन्हा बांधण्यात आला नाही परिणामी या एस टी बस थांब्याबर अवलंबून असणाऱ्या वाणीवाडी, धावडेवाडी, गुंडयेवाडी व गावठणवाडी येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबत महाराष्ट्र् राज्य एस टी महामंडळ विभागीय कार्यलय कणकवली येथे विभाग नियंत्रक प्रमुख श्री. रसाळ यांची नडगीवे बांबरवाडी येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन नडगीवे बांबरवाडी येथे प्रवाशी निवारा बस थांबा शेड बांधून देण्याची मागणी केली.
