सुरेश पेडणेकर , सुधाकर देवस्थळी , लक्ष्मण प्रभू व रविंद्र मुसळे यांनी दिला इशारा
*⚡कणकवली ता.२०-:* सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या पाच हप्त्यांपैकी दुसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जुलै पेड इन ऑगस्टमध्ये आदा करण्याबाबतचा शासन निर्णय झाला , परंतु त्यावेळी निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन व दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळून १३ कोटीची आवश्यकता होती , परंतु शासनाकडून १० कोटीच आल्यामुळे त्यावेळी फक्त नियमित निवृत्तीवेतन आदा करण्यात आले . अपुऱ्या रकमेमुळे दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही . कोणत्याही परिस्थितीत २० सप्टेंबर रोजी सदरचा धनादेश बॅकेकडे जमा न केल्यास २१ रोजी आम्ही सर्व निवृत्त प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी कार्यालयासमोर उपस्थित राहणार असल्याचा इशारा सुरेश पेडणेकर , सुधाकर देवस्थळी , लक्ष्मण प्रभू व रविंद्र मुसळे यांनी दिला आहे. यावेळी निवृत्ती वेतन अधिक फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे वित्तोधन २७ ऑगस्टलाच आले . त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याव्यतिरिक्त सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे नियमित निवृत्ती वेतन व दुसऱ्या हप्त्याची रक्कम अशा दोन्ही रक्कमा ८ सप्टेंबर रोजी अदा करण्यात आल्या , मात्र कणकवली विकास गटाकडून दुसऱ्या हप्त्याची रक्कम अदा न करता फक्त निवृत्तीवेतन ८ सप्टेंबरला अदा करण्यात आले . बरेच दिवस झाले तरी ही रक्कम का दिली जात नाही त्याची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी पं.स. कणकवली यांची शिक्षक प्रतिनिधी भेट घ्यावयास गेले असता गटविकास अधिकारी जिल्ह्याला निघून गेल्याचे समजले . त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्याशी समक्ष चर्चा केल्यानंतर सदरची देयके २ , ३ सप्टेंबरला मंजूर केल्याचे समजले , त्यानंतर संबंधित कार्यासन कर्मचारी यांना बोलावून विचारणा केली असता २० तारीख आली तरी त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले . त्यावेळी उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत २० सप्टेंबर रोजी सदरचा धनादेश बॅकेकडे जमा न केल्यास २१ रोजी आम्ही सर्व निवृत्त प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी कार्यालयासमोर उपस्थित राहू असे सांगण्यात आले . कणकवली विकास गटाच्या प्रशासनाकडून अकारण केलेल्या विलंबाबाबत नापसंती व्यक्त करण्यात आली . एकीकडे शासनाकडून रक्कमा वेळीच येत नाहीत तर दुसरीकडे आलेल्या रक्कमा निवृत्त शिक्षकांना वेळीच अदा न करण्याबाबतची प्रशासनाची उदासिनता दिसून आली . अशी माहिती सुरेश पेडणेकर , सुधाकर देवस्थळी , लक्ष्मण प्रभू व रविंद्र मुसळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे .
