शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांचा आरोप
*💫वेंगुर्ले दि.१८-:* राणे भाजपची सत्ता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासहित विषय समिती सभापती अकार्यक्षम असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सभापती आबा कोंडस्कर यांनी केला आहे.जिल्हा परिषदेच्या सेस मधून कृषी विभागासाठी २० टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती. एकूण १ कोटी ६२ लाख ६३ हजार ८७५ एवढ्या निधीची तरतूद असूनही आता पर्यंत केवळ ७० लाख १९ हजार ३६६ रुपये एवढाच निधी खर्च झाला आहे.
सत्ताधारी भाजप पदाधिकारी एकूण तरतुदी पैकी ५० टक्के रक्कम सुद्धा खर्च करू शकले नाही आहेत. शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी वस्तू खरेदी केल्यावर संबंधित कागदपत्रे कृषी विभागाकडे सादर केल्यावर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा कराव्याचे असल्याने, सत्ताधारी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना काहीही मलींदा लाटायला मिळत नसल्याने शेतकऱ्यांपर्यंत योजनेच्या माध्यमातून पैसा पोहचवण्यासाठी ते अपयशी ठरले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हा नियोजनाच्या निधीतून गळा काढणाऱ्यांनी प्रथम जिल्हा परिषदचा स्वनिधी खर्च करून दाखवावा असे आवाहन देखील कोंडस्कर यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे २० टक्के पैसे सुद्धा खर्च करू न शकलेल्या भाजप सत्ताधाऱ्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने हद्दपार करावे असे आवाहन देखील आबा कोंडस्कर यांनी केले आहे.
