पांढरी गाडी बोरिवलीसाठी सोडली नसल्याने प्रवाशांचा हंगामा

पोलीस पोहोचले बस स्थानकात दोन तासांनी वाद मिटला

*⚡मालवण ता.१७-:* मालवण आगारातून सायंकाळच्या वेळी सुटणाऱ्या मालवण बोरिवली या साध्या गाडीचे प्रवासाचे आरक्षण केल्यानंतर आम्हाला लाल रंगाची एसटी बस न देता विठाई नाव असलेली पांढऱ्या रंगाचीच गाडी प्रवास करण्यासाठी द्यावी अन्यथा गाडी जाऊ देणार नाही असा पवित्रा घेत या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन चार प्रवाशांनी मालवण बस स्थानकावर हंगामा केला. सरतेशेवटी एसटी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केल्यानंतर दोन तास हंगामा करणारे ते प्रवासी निमूटपणे बसमध्ये बसल्याने या वादावर अखेर पडदा पडला. मालवण बस स्थानकातून सायंकाळी ४:१५ वाजता सुटणारी मालवण बोरिवली बस ही आपल्या नियोजित वेळेनुसार फलाटावर लागली होती. या गाडीचे जवळपास पंधरा प्रवाशांनी मुंबई बोरिवलीला जाण्याचे आरक्षण केले होते. काही प्रवाशांनी आपले सर्व साहित्य बसमध्ये नेऊन ठेवले होते मात्र, त्यातील दोन चार प्रवाशांनी ज्यावेळी आम्ही मालवण बस स्थानकावर तिकीट आरक्षित करण्यासाठी आलो होतो त्यावेळी पांढऱ्या रंगाची विठाई बस असणार असे तिकीट बुक करणाऱ्या क्लार्क ने सांगितले होते त्यामुळे आम्ही तिकीट बुकिंग केले मात्र, प्रत्यक्षात फलाटावर विठाई गाडी न लावता साधा लाल डबा लावण्यात आला असा आरोप त्या प्रवाशांनी करून आम्ही या एसटीतून प्रवास करणार नसल्याचा पवित्रा घेतला. हा पवित्रा घेतानाच विठाई गाडी सोडत नसाल तर ही गाडी जाऊ देणार नाही आमचे पैसे परत द्या असे सांगितले. यावेळी डेपो मॅनेजर नरेंद्र बोधे यांनी साध्या गाडीचे तिकीट आरक्षित करण्यात आली आहे विठाई ही गाडी सुध्दा साधीच आहे फक्त गाडीच्या रंगामध्ये फरक आहे अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रवाशांनी आपला हेकेखोर पणा सोडला नाही. सरतेशेवटी एसटी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत फारणे, सुभाष टेंबुलकर, पोलीस पाटील वासुदेव गावकर हे बस स्थानकात दाखल झाले. एसटी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर प्रवाशांचे म्हणणेही ऐकून घेतले. पोलिसां समोरही त्या प्रवाशांनी आमचे पैसे परत मिळण्याची मागणी केली. मात्र, तुम्हाला अशा प्रकारे एसटी थांबवता येणार नाही. तुमची काही तक्रार तर वरिष्ठ कार्यालयात करा. या बसने जाणाऱ्या प्रवाशांनी बसमध्ये बसून घ्यावं अशी सूचना केली. त्यानंतर तब्बल दोन तासांनी बस स्थानकातून ही बस मुंबईला जाण्यास रवाना झाली.

You cannot copy content of this page