*⚡बांदा ता.१५-:* गणेशोत्सव सुरू असताना गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात ३५ दारुचे बॉक्स व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार असा एकूण २ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रथमेश प्रभाकर राऊळ (२६, रा. मोरेवडाचे टेंब, वाडोस, ता. कुडाळ) या युवकाला अटक करण्यात आली. दारु वाहतुकीसाठी वापरलेली अल्टो कार (एमएच ०२ बीडी ३५२३) ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई बांदा – पत्रादेवी मार्गावर करण्यात आली. गोव्यातून दारु वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती कोल्हापूर पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, उपनिरीक्षक आर. जी. येवलुजे, कुमार कोळी, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, कृष्णात पाटील व दीपक कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बांदा-पत्रादेवी मार्गावर बेकायदा दारु वाहतुकीवर कारवाई
