कणकवली 12 सप्टेंबर (प्रतिनिधी)-ओसरगाव तलाव येथे रोटरी क्लब कणकवली च्या वतीने पर्यटकांच्या बैठक व्यवस्थेसाठी 5 सिमेंट बाकडे देणगीस्वरूपात देण्यात आले. माजी उपसरपंच बबली राणे यांच्या संकल्पनेतून ओसरगाव तलावाच्या ठिकाणी यावर्षी प्रथमच नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त ओसरगाव तलावात जलपूजन करण्यात आले. नारळी पौर्णिमेला उपस्थित असताना कणकवली रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी ओसरगाव तलावठिकणी येणाऱ्या पर्यटकांच्या बैठक व्यवस्थेसाठी सिमेंट बाकडे देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार शब्दपूर्ती करत डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्याकडे 5 सिमेंट बाकडे सुपूर्त केले. लवकरच यांचे लोकार्पण करणार असल्याचे बबली राणे यांनी सांगितले. यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य सुदर्शन नाईक, संदेश नाईक, महेश मोर्ये, अमित तोरसकर आदी उपस्थित होते. ओसरगाव तलाव हा नॅशनल हायवेलगत असलेला अत्यंत निसर्गरम्य असा परिसर आहे. याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी, सहलीसाठी, वनभोजन यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येणाऱ्या पर्यटकांना बैठकीची सुविधा निर्माण करून देण्यासाठी किमान 100 सिमेंट बाकड्यांची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बबली राणे यांनी केले आहे.
कणकवली रोटरी क्लबच्यावतीने ओसरगाव तलाव येथे सिमेंट बाकडे
