हर्षा ठाकूर;यापूर्वी आम्ही पालकामंत्र्याना भेटलेलो..प्रवेश केला नव्हता
*⚡देवगड ता.०४-:* देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेश हा पहिला प्रवेश असून यापूर्वी आपल्या प्रभागातील विकास कामांकरिता आपण पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर शिवसेनेत आमच्या वैयक्तिक विकासाकरीता आम्ही प्रवेश केला नसून राजकारणावर आमचे पोट अवलंबून नाही .अशी प्रतिक्रिया शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.शिवसेना पक्ष प्रवेश केल्यानंतर केलेल्या नगराध्यक्षांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, राजकीय पदाचा गैरवापर करून अनधिकृतपणे माया गोळा करून कुठल्याही बँकांची थकीत कर्जे फेडलेली नाहीत. तसेच आपण अनधिकृतपणे कुठलीही प्रॉपर्टी केलेली नाही. बँकांची देणे थकून आपल्या घरावर जप्तीची ही वेळ यायला दिली नाही. नगरपंचायत सत्ता आल्यापासून त्याचा वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी व कशा प्रकारे आर्थिक गैर फायदा करून घेतला व स्वतःची घरे भरली हे देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना ज्ञात आहे. असे स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक विकास कोयंडे उपतालुकाप्रमुख निवर्त्ती उर्फ बुवा तारी, युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे,जेष्ठ शिवसैनिक दादा पडेलकर उपस्थित होते. यापुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या, माझ्या प्रभागात यापूर्वी झालेली विकास कामे ही माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर तसेच विद्यमान पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्याच प्रयत्नाने व शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या निधीतून झालेली आहेत. त्याच बरोबर यापुढील कामात काळातदेखील पालक मंत्री यांच्या प्रयत्नाने निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. पावसाळ्यानंतर या विकास कामांना सुरुवात करून ती पूर्ण केली जातील .असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या एकाही नेत्याने आपल्या प्रभाग क्रमांक १४मध्ये विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून दिलेला नाही. असेही त्यांनी आवर्जून सांगितले. नगरपंचायत ऑनलाइन मिटिंग सुरु असताना सत्ताधारी ठराविक नगरसेवक मीटिंगमध्ये उपस्थित राहतात व त्या वेळी आपली उपस्थिती त्यांना खटकते नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक असेल तर ऑनलाइन मीटिंगची लिंक एकाही मिडीयाच्या प्रतिनिधीं दिली जात नाही . भाजपचे काही पदाधिकारी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर आरोप करतात पण याच व्यक्ती आपणाशी खाजगी भेटून आपण घेतलेला निर्णय योग्य आहे .असे सांगतात म्हणजेच आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करण्याकरता ते पत्रकार परिषद घेतात. असेही समजायचे का अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली आहे.
