बुजविलेल्या खड्डयांनी पुन्हा मूळ स्वरूप दाखवून न.पा.च्या कामावर फिरविले पाणी

मालवण शहरातील नागरिक झाले नाराज

*⚡मालवण ता.०४-:* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून मालवण शहरातील रस्त्यांवरील पडलेले खड्डे सिमेंटने बुजविण्याचे काम कालपासून हाती घेण्यात आल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांपासून सुटका होणार या विचारात नागरिक असतानाच आज नगरपालिकेच्या खड्डे बुजविणाऱ्या टीमने भर पावसात काम सुरू ठेवून तत्परता दाखविली खरी परंतु काही वेळाने नगरपालिकेने बुजविलेले खड्डयांनी पुन्हा मूळ स्वरूप दाखवून नगरपालिकेच्या कामावर पाणी फिरविले .या प्रकाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात रस्त्यावरील खड्डे बुजविणे, झाडी कटाई आदी कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांची काल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पाहणी करत आढावा घेतला होता. आजही सकाळ पासून शहरात खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र आज सकाळपासून शहरात अधून मधून पाऊस बरसत असल्याने रस्त्यांवर पाणी साचले असून खड्डेही चिखलाने भरले गेले आहेत. खड्डे बुजविण्यास अनुकूल परिस्थिती नसताना देखील या चिखलमय खड्ड्यात सिमेंट ओतून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत होते. भरड नाका येथील सिंधुदुर्ग कॉलेज कडून जाणाऱ्या रस्त्यावरही अशाच प्रकारे खड्डे बुजविण्यात आल्यानंतर रस्त्यावरील पाण्याने हे सिमेंट इतरत्र पसरून गेले. तर वाहनांनाही हे सिमेंटने भरलेले खड्डे चुकवत ये- जा करावी लागत असल्याने अपघाताचीही भीती आहे. तर गाड्यांच्या टायर मुळे हे सिमेंट खड्ड्यातून बाहेरही येत आहे. भरड नाका येथील रिक्षा चालकांनी हे सिमेंट पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनांच्या वर्दळीमुळे तो असफल झाला. चुकीच्या वेळी व चुकीच्या पद्धतीने केलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामाबाबत नागरिक व वाहांचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून पावसात खड्डे बुजवून उपयोग काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

You cannot copy content of this page