परिणाम वाढत्या कॉपी राईटचा…

ग्राहकांची कॅसेटच्या दुकानांकडे पाठ;दुकानदारांसह, सिडी निर्माता व भजनीबुवांना फटका

*⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-:* आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाच्या आगमनाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. बाजारपेठेत गणेश सजावट, गणेश पूजेचे साहित्य, गणपतीला लागणारे मोदक व खाद्य पदार्थांची, फटाक्यांच्या खरेदीची रेलचेल चालू असताना गणेशोत्सव संगीतमय, भक्तीमय व वाजत गाजत होण्यासाठी दरवर्षी भजनीबुवांच्या भजने तसेच डबरबारी आणि इतर भक्तीगीतांच्या ऑडिओ कॅसेटस् बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. पूर्वी या भजनीबुवांच्या आॅडीओ सिडींना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद होता. मात्र गेल्या काही वर्षापासून वाढत्या कॉपी राईटमुळे ग्राहकांनी कॅसेटच्या दुकानांकडे पाठ फिरविल्याने याचा फटका दुकानदारांसह, सिडी निर्माता व पर्यायाने भजनीबुवांनाही बसत आहे. कोकणातील महत्वाचा गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात बाजारपेठेत गणेशाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची रेलचेल सुरू झाली आहे. पूजेआठी लागणारे साहित्य, खाद्य पदार्थ विविध प्रकारचे फटाके बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पूर्वीच्या काळात या सर्वांबरोबर विविध भजनी बुवांच्या भजनी सिडीचीही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असे, मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या कॉपीराईटचा परिणाम, रिमेकचा अतिरेक व सर्वच भजनीबुवा अशा सिड्या तयार करत असल्याने त्या ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरत नाहीत. त्यामुळे भजनी सिडीची मागणी हळूहळू कमी झाली. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवा अगोदर मुंबई तळ कोकणातील भजनेमंडळे भजनाच्या रंगीत तालीमी सुरू करून नवनवीन अभंग, गवळणी, गजर यांच्या दर्जेदार चाली गुंफून त्या स्वरबद्ध करून त्याची आॅडीओ सिडी बनवून त्यानंतर ती विक्रीस येत असे. याची सुरुवात विजयकुमार काटे, कृष्णा पवार, चंद्रकांत कदम, विलास पाटील, चिंतामणीबुवा पांचाळ, रामदास कासले भालचंद्र केळूसकर, भगवान लोकरे, प्रमोद हर्याण, काशीराम परब, राजेंद्र बोभाटे यांच्या ध्वनिफितीने झाला व अल्पावधीत तुफान लोकप्रिय झाल्या. भजनीबुवांच्या या कॅसेटही लोक विकत घेऊन त्यांना चांगला प्रतिसाद देत असत. आॅडीओ कॅसेटच्या दुकानावर सुरू असलेल्या भजनी कॅसेटमुळे चतुर्थीच्या वातावरण निर्मितीत आणखीनच भर पडे व भजन प्रेमींची पाऊले आपसूकच या दुकानाकडे वळत असत. गेल्या काही वर्षात स्थानिकांसह अनेक बुवांनी आॅडीओ सिडी निर्माण केल्या. यामध्ये दिप्तेश मेस्त्री, कृष्णा राऊळ, सुनील कानसे, योगेश प्रभू, श्रीकृष्ण कुंटे, विजय पांचाळ, विठ्ठल गावकर, रणजित परब, स्वप्नील परब, अनिल पांचाळ, रुपेंद्र परब या स्थानिक बुवांनी आपल्या भजनाच्या ऑडिओ सीडी निर्माण केल्या. त्यासही लोकांचा भरभरून प्रतिसादही मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या मोबाईल, पॅनड्राईव्ह, कॉपीराईटचा परिणाम जाणवू लागला. एखाद्या व्यक्तीने एखाद्या बुवाची सीडी खरेदी केली की ब्लूथूथ, शेयरइट आदी माध्यमातून त्यातील भजन इतरांना पाठवले जात असल्याने भजनाच्या सीडी विक्रीवर त्याचा परिणाम जाणवू लागला. त्यामुळे भजनाची सीडी बनवून भजनी बुवांना नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे भजनाच्या सीडी बनविण्याकडे भजनी बुवांनी पूर्णतः पाठ फिरवली.

You cannot copy content of this page