Headlines

कुडाळमध्ये दुर्गामाता दौडीतून शौर्य, भक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश…

लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके:१६ कर्तबगार महिलांचा सन्मान..

⚡कुडाळ ता.१९-: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे आयोजित दुर्गामाता दौडीतून शौर्य, भक्ती, शक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश देण्यात आला. कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील महिलांनी सादर केलेल्या लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ‘स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्राची सन्मान सोहळा २०२६’ अंतर्गत सन्मानित १६ कर्तबगार महिलांचाही गौरव करण्यात आला.
दुर्गामाता दौडीला आई केळबाई मंदिर येथून प्रारंभ झाला. कुडाळ बाजारपेठ, शिवाजीनगर मार्गे जिजामाता चौकापर्यंत ही दौड काढण्यात आली. दौडीच्या स्वागतासाठी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी शिवप्रेमी सदस्य उन्मेषा दाभोलकर यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेसह स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “आजच्या संगणक युगात महिलांनी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.”
दुर्गामाता दौड ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून तरुण पिढीमध्ये भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्मजागृती निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासातील शौर्य, पराक्रम आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महिलांचे सक्षमीकरण, सशक्तीकरण आणि सबलीकरण हेही या दौडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे दाभोलकर यांनी सांगितले.

महिलांसाठी घरबसल्या रोजगाराची संधी

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबाबत बोलताना दाभोलकर म्हणाल्या की, महिला ही कुटुंब आणि समाजाच्या जीवनाचा आधार आहे. महिलांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शिवणकाम हा घरबसल्या उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा व्यवसाय असून, महिलांना सन्मानाने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येत्या दोन दिवसांत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत सरकारप्रणीत महिला उद्योजकता विकास अभियान, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, संजीवन उद्योग समूह आणि शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, वैद्यकीय, धर्मादाय व बौद्धिक क्षेत्रांत सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना संघटित करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यभर प्रयत्न सुरू आहेत. ‘घरी बसून शिवणकाम करा, सन्मानाने कमवा’ आणि ‘गाव तिथे रोजगार’ या संकल्पनांतून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
या अभियानांतर्गत नुकत्याच ‘स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्राची सन्मान सोहळा २०२६’ या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ कर्तबगार महिला दुर्गामाता दौडीत सहभागी झाल्या होत्या. या अभियानात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उन्मेषा दाभोलकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, मनोज वालावलकर, विवेक पंडित, रमाकांत नाईक, शिवम म्हाडेश्वर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, अंजली वालावलकर, रेवती राणे, धारकरी गोपाळ भिसे, स्वरूप वाळके, अदिती सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत, रोहिणी घाडी, पद्मा वेंगुर्लेकर, आनंद वेंगुर्लेकर यांच्यासह शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page