वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा
मालवण दि प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर बंद करण्याच्या हालचाली आज सुरु झाल्या नंतर मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर आणि भाजप मालवण शहर अध्यक्ष श्री. दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देत मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांची भेट घेऊन कोविड सेंटर बंद करू नये अशी मागणी केली ही मांगणी करतानाच कोविड सेंटर बंद झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला आहे. मालवण नगरपालिकेच्या अखत्यारीतील जागेत सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर आज बंद करण्यात येत असल्याची माहिती मालवण भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील तसेच मालवणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर, विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, नगरसेवक आपा लुडबे, भाऊ सामंत पंकज पेडणेकर, विजय चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. राज्य शासनाने कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले असून त्याची कार्यवाही आजपासून झाली. या संदर्भात मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांच्याशी संवाद साधताना मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाने कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. तसेच आगामी काळात गणेश चतुर्थी येत आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चाकरमानी गावोगावी येणार असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत कोविड सेंटर बंद करणे चुकीचे असून हा प्रकार लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. केरळ मध्ये कोरोनाची लाट उद्भवलेली आहे तर महाराष्ट्राची कोरोना रुग्ण संख्याही दुप्पट वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड सेंटर बंद केले तर धोका अधिक आहे आणि अन्यायकारक आहे असे सांगत ते म्हणाले, हे कोविड सेंटर बंद झाल्यानंतर रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवा दर्जेदार नाही तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना मालवणहून ओरोसला वाहतूक करण्याच्या दृष्टीने अवघड व खर्चिक होणार आहे त्यामुळे हे कोविड सेंटर बंद करू नये अशी यावेळी मागणी केली.
