भयमुक्त वातावरणात व जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी प्रयत्न
*⚡मालवण ता.२६-:* गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी काळात येणारे सण , उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावेत व जिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी मालवणात आज सायंकाळी पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस यांचे संचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यासह पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस या पथकातील पोलीस पथक संचलनास सहभागी झाले होते. मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाड येथून भरड बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार येथे संचलन करण्यात आले. मालवणात कायदा सुव्यवस्था कायम रहावी, आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भयमुक्त वातावरण रहावे, सण शांततेत पार पडावे व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आले, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मालवण पोलीस निरीक्षक एस.एस.ओटवणेकर यांनी केले.
