अपघात होण्याची शक्यता ः रुग्णांना न्यावे लागते हातावरून
*⚡बांदा ता.१८-:* दांडेली-घोणसेवाडी व फणसमाडे या वाड्यांना जोडणारे लोखंडी पूल गंजले असून ये-जा करण्यासाठी धोकादायक बनले आहे. पुलावरील लोखंडी पत्रे निखळल्याने दुचाकी नेणे सुद्धा जीवावर बेतणारे आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना केवळ हातावरून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत असल्यामुळे सदर पुलाची तात्काळ दुरूस्ती करून कायमस्वरुपी कॉंक्रिटचे पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घोणसेवाडी व फणसमाडे वाड्यांना गावाशी जोडणारे पुल कमी रुंदीचे असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत पुलाच्या दोन्ही बाजूंनी पूर आल्याने वाड्यांचा गावाशी संपर्क तुटला होता. परिणामी शेकडो ग्रामस्थांना बांदा-शिरोडा या मुख्य रस्त्यावर थांबून पाणी ओसरण्याची वाट बघावी लागली. तसेच नवख्या वाहनचालकास धोकादायक पुलावरील भागाचा अंदाज न आल्यास सुमारे 20 ते 25 फुट खोल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. एकंदरीत प्रशासनाने नवीन कॉंक्रिटचे कायमस्वरुपी पूल बांधण्याची मागणी दांडेली ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, सरपंच कृष्णा पालयेकर, उपसरपंच सत्यनारायण माणगावकर, ग्रा.पं.सदस्य निलेश आरोलकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष देवेंद्र माणगावकर यांनी पुलाची पाहणी केली. पुलावरील लोखंडी पत्र्यांची येत्या चार दिवसांत तात्पुरती दुरूस्ती करणार आहे. तसेच सदर पुल कॉंक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव केला असून लवकरच समस्या मार्गी लागणार असल्याचे सरपंच पालयेकर यांनी सांगितले.
