विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्रामपंचायतीने केला सत्कार
*⚡दोडामार्ग ता.१७-:* ग्रुप ग्रामपंचायत केर भेकुर्लीच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा स्वातंत्र्य दिनी पार पडला. या उदघाटन सोहळ्यात कोविड काळात बहुमोल भूमिका पार पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर, शिक्षण क्षेत्रातही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार तसेच केर गावातील प्राचीन आयुर्वेदिक वारसा जपणाऱ्या वैदूंचा सत्कार करतानाच गावचे पोलीस पाटील व माजी सैनिक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी व उदघाटक म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, जि. प. महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गावकर, जि. प. सदस्य संपदा देसाई, दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, दोडामार्ग पं.स. सभापती संजना कोरगावकर, उपसभापती सुनंदा धर्णे, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, दोडामार्ग पंचायत समिती ग. वि. अ. मिलिंद जाधव, गणेश प्रसाद, पोलीस उपनिरीक्षक पाटील, घोटगेवाडी ग्रामसेविका सोनिया नाईक व बोडणे ग्रामसेविका सुजाता जगताप आदी उपस्थित होते. यावेळी आमदार केसरकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, केर भेकुर्ली ते शिरवल रस्ता एस टी बस वाहतुकीसाठी लवकरच खुला करून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला. तसेच निडलवाडी येथील बोऱ्याचे गाळवं येथे वाहतुकीसाठी कॉजवेची सोय करून देऊ तर, दिवसेंदिवस केरमध्ये हत्तीचा वावर वाढत असल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर लाईटची व्यवस्था करून देऊ असेही आश्वासन त्यांनी दिले.
