विशेष राखीव कोटा ठेवल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी मानले आभार
*⚡कणकवली ता.१७-:* कोरोना लसीकरणसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डोस ठेवावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार नीतेश राणे व जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कणकवलीत कणकवली कॉलेज येथील लसीकरण केंद्रावर स्वतंत्र कोविशील्डचे 100 डोस उपलब्ध करून दिले. 17 ऑगस्ट रोजी लसीकरणमध्ये कणकवली कॉलेजच्या इमारतीत ज्येष्ठ नागरिकांना 100 डोस स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. लसीकरण केंद्रावर होत असलेल्या गर्दीमुळे डोस संपल्यानंतर उर्वरित नागरिकांना माघारी परतावे लागते. हा त्रास ज्येष्ठ नागरिकांनाही होतो . रांगेत राहूनही डोस न मिळताच ज्येष्ठ नागरिकांना घरी यावे लागते. यावर उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय म्हणून वेगळा कोटा ठेवण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केली होती. नगराध्यक्ष नलावडे यांनी ही बाब आमदार नितेश राणेंच्या कानावर घालताच तात्काळ आमदार नीतेश राणे यांनी जि.प.अध्यक्षांशी चर्चा करत तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली होती. आमदार नीतेश राणे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्याशी चर्चा करून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोटा ठेवण्याचे निर्देश दिले. याचा लाभ घेत जेष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोव्हीड लसचा विशेष राखीव कोटा ठेवल्याबद्दल आमदार नीतेश राणे, जि.प.अध्यक्ष संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आभार मानले.
