गणेशोत्सवानंतर साफसफाई करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ रस्त्याची गटारांची साफसफाई करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधुनही गटारांची साफसफाई न झाल्याने मसदे चुनवरे ग्रामपंचायतीच्या वतीने आज मालवणच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले. यावेळी विरण बाजारपेठ रस्त्याच्या गटारांची साफसफाई तात्काळ करण्यात येईल, तसेच तेथील गटारांचे मंजूर असलेले काम गणेश चतुर्थीनंतर सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन सा. बां. उपविभागाचे उपभियंता श्री नितिन दाणी यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. विरण बाजारपेठेतील गटारांच्या साफसफाई बाबत आज मसदे चुनवरे ग्रामपंचायतीतर्फे उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात आला. यावेळी सरपंच श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे, शमिका वाडकर, दत्ताराम आंबेरकर, शिवराम वाडकर, भाऊ पांजरी आदी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर उपोषणास बसले. या उपोषणाला भाजपतर्फे पाठिंबा देण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. चे माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, चिंदरचे उपसरपंच दीपक सुर्वे, संतोष गावकर, भाई मांजरेकर आदींनी उपोषणस्थळी उपस्थित राहत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच गटार साफसफाई होण्याबाबत बांधकाम उपअभियंता श्री. नितीन दाणे यांचे लक्ष वेधले. फोटो- उपोषणास बसलेल्या मसदे चुनवरे ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधीना विरण बाजारपेठेतील रस्त्यांच्या गटारांची साफसफाई करण्याबाबतच्या आश्वसनाचे लेखी पत्र देताना अभियंता नितीन दाणे, सोबत धोंडी चिंदरकर, अनिल कांदळकर व इतर. (छाया- भूषण मेतर)
