वनविभागाने ११ किलोचा पदार्थ घेतला ताब्यात
*⚡मालवण दि.०६-:* पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या देवबाग ख्रिश्चनवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी फ्रान्सिस जॉन फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक या मच्छीमारांना मौल्यवान असा ‘अंबरग्रीस’ हा देवमाशाच्या (व्हेल मासा) उलटीसदृश अत्यंत सुवासिक व मौल्यवान पदार्थ सापडला असून सुमारे ११ किलो वजनाची ही उलटी वनविभागाने ताब्यात घेतली आहे पीठासारखा चिकट असलेला हा पदार्थ सुमारे अकरा किलो वजनाचा आहे. मच्छीमारांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने हा पदार्थ ताब्यात घेतला आहे. पुढील तपासणीसाठी कोलकता येथील तपासणी प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग अत्तर निर्मितीत करण्यात येतो असे म्हटले जाते. अतिशय किमती असणाऱ्या या पदार्थाची २५ ते ३० लाख रुपये किलो अशी मोठी किंमत बाजारात आहे. मात्र वन्य जीव कायदा १९७२ नुसार व्हेल माशाची उलटी व इतर कोणत्याही अवयवांची विक्री ही अवैध असून कारवाईची तरतूद असल्याची माहिती वन अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
