स्वनिधी चौकशी अहवाल आठ दिवसांत आयुक्तांना पाठविणार सीईओ नायर यांचे आंदोलकांना आश्वासन
*⚡ओरोस ता.०२-:* स्वनिधी वाटपात झालेली अनियमितता व आयुक्तांनी चौकशी अहवाल पाठविण्यास सांगूनही होणारी चालढकल यामुळे सोमवारी शिवसेनेच्या सदस्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यानंतर सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आपल्या दालनात चर्चेसाठी बोलाविले. यावेळी सदस्य प्रदीप नारकर यांनी दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली. तसेच स्वनिधी बाबत आठ दिवसांत चौकशी करून आयुक्त व शासनाला अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन नायर यांनी दिल्याने सेना सदस्यांनी आंदोलन मागे घेतले. सुरुवातीला सेनेच्या सदस्यांनी सीईओ दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या मनमानी विराधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचा सातत्याने पाठपुरावा करणारे प्रदीप नारकर यांच्यासह गटनेते नागेंद्र परब, सदस्य व जिल्हाप्रमुख संजय पडते, सदस्य स्वरूपा विखाळे, अमरसेन सावंत, मायकल डिसोझा, संजय आंग्रे, रोहिणी गावडे, वर्षा कुडाळकर, संपदा देसाई, वर्षा पवार, राजेश कविटकर, राजन मुळीक हे सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी सीईओ नायर यांनी प्रदीप नारकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे प्रत्येक मुद्दयावर चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारत नेमकी वस्तुस्थिती काय आहे ? याचा खुलासा करून घेतला. सदस्य नारकर यांची स्वनिधी अनियमितता याबाबत चौकशी अहवालाची मागणी होती. त्याबाबत सीईओ नायर यांनी ही चौकशी सुरू आहे. ती संपल्यावर मी माझे म्हणणे मांडून पुढील आठ दिवसांत याचा अहवाल आयुक्त व शासनाला सादर करणार आहे, असे सांगितले. या चर्चेत समाधान झाल्याने नारकर यांच्यासह सेना सदस्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
