*⚡मालवण ता.३१-:* येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंतराव गंगाराम परुळेकर (वय ९३) यांचे आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास मालवण बांगीवाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्री. परुळेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मालवण बांगीवाडा येथील रहिवासी असणारे श्री. वसंतराव परुळेकर यांचा तीन वर्षांपूर्वी मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगण येथे त्यांच्या विद्यार्थी वर्गाच्या वतीने नव्वदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. याच कार्यक्रमात मालवण नगरपालिकेच्या वतीने त्यांचा हृद्यसत्कार करण्यात आला होता. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून श्री. परुळेकर यांची गणना होत होती. गणित आणि विज्ञान या विषयात त्यांचा हातखंडा होता. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीत विद्यार्थ्यांना गणित शिकविण्याचे काम श्री. परुळेकर यांनी केले. १९८७ मध्ये परुळेकर हे भंडारी हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतरही परुळेकर सर हे विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मार्गदर्शन करत असत. उच्चशिक्षण घेतलेल्या परुळेकर सर यांनी आपल्या आईच्या शब्दाखातर हवाई दलातील नोकरी नाकारून शिक्षकी पेशा पत्करला. मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने त्यांना य. बा. चोपडे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव परुळेकर निधन
