*💫सिंधुदुर्ग दि.२७ प्रसन्न गोदावळे -: ठाकरे घराण्यातील पाहिले व शांत, संयमी, संवेदनशील असे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनलने त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा घेतलेला धावता आढावा उद्धव ठाकरेंचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. शिवसेनेचे संस्थापक दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. सौ. मीनाताई ठाकरेंचे यांचे ते चिरंजीव असून प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंचा त्यांना समृद्ध वारसा लाभलेला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतलेले उद्धव ठाकरे यांची छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांची दखल अनेकदा नामवंत मासिकांनी घेतलेली आहे. स्व. बाळासाहेबांचे चिरंजीव असल्याने त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू असल्याने विद्यार्थी दशेपासून ते राजकारणात सक्रिय होते. १९९७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आणि ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडत महानगरपालिकेवर भगवा फडकवला होता. त्यांच्या नेतृत्व गुणांची ओळख होताच स्व. बाळासाहेबांनी २००३ मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंकडे महत्वपूर्ण जबाबदारी दिली ती जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यावर २००४ मध्ये शिवसेनेची संपूर्ण धुराच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवित आपला उत्तराधिकारी घोषित केले. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्या बरोबरीने राजकारणात त्यांना साथ देतात. त्यांना आदित्य व तेजस ही दोन मुल असून आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातुन निवडून येऊन मंत्रिपदावर विराजमान आहेत. शिवसेनाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेला आधुनिकतेशी जोडत सर्वसमावेशक करताना युवक, कामगार, शेतकरी यांच्यासाठी राज्यभर आंदोलने करत यश मिळविले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल ग्रीनिज बुकमध्ये घेतली गेली आहे. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंना औषध पुरवठा केला आहे. मुंबईतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी रुग्णालयांची निर्मिती केली आहे. रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली आहे. शेतकरी कल्याणावर भर देत त्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि राज्याने त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक, कवी, छायाचित्रकार आणि अभ्यासू असलेल्या उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडवून आणत पक्ष संघटना सुसंघटित केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे तीन पक्षांची मोट बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर देशावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले. महाराष्ट्रात ते सर्वात जास्त पसरले. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात कहर केला. परंतु कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेले उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे संकट पेलत राज्याचा गाडा समर्थपणे हाकत आपल्या हुषारीची चुणूक दाखवून दिली. कोरोनाच्या संकटात मातब्बर नेत्यांना जमणार नाही असे कौशल्य दाखवत महाराष्ट्राने कोरोनाशी संघर्ष केला तो उद्धव ठाकरेंच्या अचूक निर्णयक्षमतेमुळेच. त्यांनी हॉस्पिटल उभारणी, डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता आणि आरोग्याच्या सुविधांची योग्य ती काळजी घेत उत्तमरीत्या प्रशासकीय बाबी हाताळल्या आहेत. राज्यातील डॉक्टर इत्यादी कोरोना योद्ध्यांना आणि जनतेला वारंवार धीर देत कोरोनाशी लढण्याचे मानसिक बळ दिले आहे. कोणत्याही भूलथापा न मारता कोरोनाच्या काळात वास्तवात जगण्याचे सामर्थ्य उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेस दिले आहे. विरोधकांच्या टीकेला काडीचीही किंमत न देता आपल्या कामावर लक्ष देत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसा असावा याचं जिवंत उदाहरण इतर राजकीय पक्षांना देत आहेत. त्यांच्या या कार्यास ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनलनचा प्रमाण.
शांत… संयम..आणि निर्णयक्षमता .. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
