अन्यथा सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा रोखण्यात येतील;बांदा सरपंच अक्रम खान यांचा इशारा
*💫बांदा दि .२६-:* गाळेल येथे दरड कोसळून तरुणाचा बळी गेल्याने याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. गोव्यात नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या तरुणांबाबत महाराष्ट्र व गोवा सरकारने येत्या ४ दिवसात समन्वय करून योग्य तोडगा काढावा अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात जाणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा रोखण्यात येतील, असा इशारा बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिला आहे. खान यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार झालेला असतानाच गाळेल-डिंगणे रस्त्यावर मातीचा भराव कोसळून त्याखाली एक युवक गाडला गेला. हा युवक कामासाठी गोवा येथे जात असताना ही दुर्घटना घडली. मुळात राष्ट्रीय महामार्ग असताना युवकांना या आडमार्गाने प्रवास का करावा लागला हाच कळीचा मुद्दा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील बहुतांश कुशल व अकुशल युवक, युवती रोजगारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या नावाखाली गेल्यावर्षी मार्चमध्ये बंद झालेल्या राज्यांच्या सिमा जेमतेमच उघडून गमावलेले रोजगार परत मिळवून तरूण तरूणी पुन्हा उभारी घेत असतानाच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सीमा प्रवेश एप्रिलमध्ये बंद करून टाकला. त्यावेळी आपण स्वतः व सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना परस्थितीचे गांभीर्य दाखवून दिले होते. तहसीलदार यांनी रोजगारानिमित ये-जा करणाऱ्यांना परवानगी दिली होती. परंतु नंतर मे महीन्यात गोवा सरकारकडून प्रवेश बंदी घालण्यात आली. केवळ ७२ तासाच्या अवधीपुरते कोरोना टेस्ट केल्यावरच प्रवेश मान्य केला गेला. वरचेवर टेस्ट करणे हे धोकादायक ठरू शकते. या जाचक निर्णयामुळे पुन्हा एकदा सुमारे १५ हजार तरुणांवर उपासमारीची टांगती तलवार उभी राहीली आहे. यामुळेच संपूर्णपणे असुरक्षितता पत्करून केवळ कुटुंब, व चरीतार्थ चालवण्यासाठी धोकादायक मार्गाचा वापर केला जात आहे. केवळ दोन्ही प्रशासनाच्या समन्वयाचा अभावामुळेच त्या युवकाचा हकनाक बळी गेला आहे, याला केवळ महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. बंद खोलीत बसून नियम बनवणाऱ्या सरकारला जनतेच्या प्रश्नाची काहीच माहिती नाही किंवा स्थानिक आमदार, पालकमंत्री या प्रश्नावर गंभीर नाहीत. शासनाला जाग येण्यासाठीच आपण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
