*💫कणकवली दि.११-:*.गेली काही वर्षें अनेक कारणांमुळे शासकिय नोकर भरती बंद आहे.कार्यालयांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणाम स्वरूप महसूल विभागाशी संबधित जनतेची कामे रखडत आहेत. त्याचा मन:स्ताप आणि जनक्षोम कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. काही राजकीय पक्ष तर ही वस्तुस्थिती समजावून न घेता आंदोलनाच्या भाषा करताना दिसतात. त्यापेक्षा आवश्यक नोकर भरतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून केली आहे. शासकीय कामाच्या अनुषंगाने गेले वर्षभर काही शासकीय कार्यालयांशी वारंवार संबध आला. त्यावेळी ही बाब ठळकपणे निदर्शनास आली, असे निरीक्षण नोंदवून चव्हाण म्हणतात, तालुका भूमी अभिलेख कार्यालयात मंजूर पदे २१ आहेत. पैकी १५ कर्मचारी आहेत. उपअधीक्षक या मुख्य पदासह पाच तांत्रिक कर्मचारी कमी आहेत. मात्र महसूलशी संबधित नकाशे, अन्य कागदपत्रांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. अपुऱ्या कर्मचार्यांमुळे तारेवरची कसरत करून कामे करावी लागत आहेत. काही विभागामध्ये तर तात्पुरत्या कर्मचार्यांकडून कामे हातावेगळी करावी लागत आहेत. कणकवली नगरपंचायतीमध्ये तर गेल्या काही महिन्यांत दोन वरिष्ठ पदे वयोमानानुसार रिक्त झाली. त्याजागी अद्याप नव्याने नेमणुका झालेल्या नाहीत. आजारपणामुळे एक वरिष्ठ कर्मचारी दिर्घ रजेवर आहेत. मुख्याधिकारी हे सद्या प्रभारी आहेत. आपल्या मुळ पदाला न्याय देता देता त्यांना या पदाला न्याय देणे, वेळ देणे जिकिरीचे ठरत आहेत. त्यामुळे सह्यांअभावी कार्यालयीन आणि जनतेंची कामे रखडत आहेत. अन्यही काही पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कर्मचारी जिल्हा कार्यलयात गेल्यास अथवा अन्य कामासाठी गेल्यास कार्यालयात शुकशुकाट दिसतो. जनतेला हेलपाटे मारावे लागतात. कमी अधिक प्रमाणात हिच परिस्थिती अन्य कार्यालयात दिसते. त्यातच अनेकदा इंटरनेटचा प्रश्न निर्माण होतो. सर्व्हर डाऊन होणे ही तर नित्याची बाब आहे. त्यामुळे जनतेची कामे रखडतात. पर्यायाने त्याचा रोष कर्मचार्यांवर होतो. या परिस्थितीत शासकीय नोकर भरती होणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांनी नाण्याच्या दोन्ही बाजू समजावून घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवेत, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय पक्षांनी आंदोलनाची भाषा न करता नोकर भरतीसाठी करावे प्रयत्न- भाई चव्हाण
