“त्या” नौकेचा परवाना व नोंदणी रद्द करा

आचरा येथील किशोरी नौकेबाबत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांचे मत्स्य विभागास आदेश

*💫मालवण दि.२४-:* मालवण बंदर हद्दीतील जलधीक्षेत्रात एप्रिल महिन्यात सापडून आलेल्या किशोरी या नौकेने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी अभिनिर्णय अधिकारी तथा मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी नौकेचा मासेमारी परवाना व नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे आदेश मत्स्य विभागास दिले आहेत. दरम्यान, नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी संबंधितांच्या ताब्यात द्यावी असे आदेश देताना नौकेला ५ हजार रुपये दंडही करण्यात आला आहे. तसेच यापुढे कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही असे लेखी हमीपत्र मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी घ्यावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मालवण परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मिनी पर्ससीन परवाना असलेली किशोर सत्यवान तोडणकर रा. आचरा पिरावाडी यांची किशोरी ही नौका तीन महिन्यांपूर्वी मालवण बंदर हद्दीतील जलधीक्षेत्रात सापडून आली होती. आचरा बंदरात ही नौका अवरुद्ध करून ठेवण्यात आली होती. १६ एप्रिल रोजी मालवण बंदर हद्दीतील जलधीक्षेत्रात आढळून आली होती. सदर नौकेने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८० तरतुदींचा भंग केला असल्याने अंमलबजावणी अधिकारी यांनी नौका मालकांना नियमानुसार शास्ती होण्याकरिता प्रतिवृत्त सादर केले होते. याप्रकरणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे कारवाई बाबत सुनावणी घेण्यात आली. मात्र, किशोर तोडणकर हे दोन्ही सुनावणीस गैरहजर होते. अखेर अभिनिर्णय अधिकारी अजय पाटणे यांनी नौकेवर दंडात्मक कारवाई करून नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र व मासेमारी परवाना रद्द करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी मालवण, यांना पाठवली असून किशोर तोडणकर यांना सदर आदेश तात्काळ बजावणी करून दंडाची रक्कम तात्काळ भरणा करून घ्यावी. तसेच बजावणी व दंडाची रक्कम भरलेला अहवाल कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा असेही तहसीलदार यांनी आदेशात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page