नगराध्यक्ष, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह नगरपंचायत टीमची धाव
*💫कणकवली दि.२३-:* मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी रात्री पासूनच सुरु झालेल्या पावसाने कणकवली शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले. कणकवली शहरात शिवशक्ती नगर व स्वामी समर्थनगरमध्ये पाणी शिरल्याने शिवशक्ती नगरमधील काही घरांचा संपर्क तुटला होता. तसेच स्वामी समर्थनगर येथे जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांच्या घरात देखील पुराचे पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार आर. जे. पवार, मुख्याधिकारी अवधूत तावडे, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह नगरपंचायतचे आपत्ती व्यवस्थापन पथक देखील कार्यरत होते.नगरपंचायतीच्या पथकात मनोज धुमाळे, रोहन डिचोलकर, सागर होडावडेकर, विनोद जाधव, गणेश लाड आदींचा सहभाग होता. तसेच विशाल डामरी व अन्य नागरिकांनी देखील मदत कार्यासाठी शिवशक्तीनगर व स्वामी समर्थनगर येथे धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिवशक्ती नगर भागात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नगरपंचायतीने नागरिकांना बाहेर काढण्याकरिता दोरखंड, अग्निशमन बंबासह अन्य साधन सामुग्री सह घटनास्थळी पोहोचतात नागरिकांना धीर दिला. शुक्रवारी पहाटे सात वाजल्यानंतर शिवशक्ती नगर मधील पाण्याचा जोर ओसरू लागला. मात्र स्वामी समर्थ नगर मध्ये साचलेले पाणी कमी होत नव्हते.
