निवृत्ती वेतन विनाविलंब देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सीईओचे आदेश
*💫मालवण दि.२०-:* जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे निवृत्ती वेतन विनाविलंब देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी निवृत्ती वेतन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने सेवानिवृत्त ग्रामसेवकाना दिलासा मिळाला आहे.याबाबत सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे यापूर्वीही निवृत्ती वेतन थकीत राहिले होते. त्यानंतर संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत निवृत्ती वेतन खात्यावर जमा झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा निवृत्ती वेतन उशिराने जमा होत असून जून २०२१ चे वेतन अद्याप जमा झालेले नाही. याबाबत पुन्हा एकदा सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवृत्ती वेतन थकीत राहिल्याबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून या संवर्गातील निवृत्ती धारकांना येणाऱ्या अडचणींची माहिती देत थकीत निवृत्ती वेतन वेळेत देण्याबाबत मागणी केली. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याच्या फरकाची रक्कमही जुलै २०२१ च्या निवृत्तीवेतना सोबत सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन निवृत्ती वेतन देण्यात विलंब करू नये अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवृत्ती वेतन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने सेवानिवृत्त ग्रामसेवकाना दिलासा मिळाला आहे.
