निशाण तलाव भरून वाहू लागले;नद्या, नाले तुडूंब
*💫वेंगुर्ले दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी येथील सकल भागात पाणी साचले असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे वेंगुर्ले शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तलाव भरून वाहू लागले आहे. वेंगुर्ले तालुक्यात १३१.६ मीमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात गेले दोन दिवस सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले आहे.आज दुपारपासून पावसासोबतच जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सतत पडणारा पाऊस व त्यात वेगाने वाहणारे वारे यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. मात्र असे असले तरी सध्या सुरू असलेल्या शेतीच्या कामामुळे शेतकरी वर्ग शेतीची कामे करताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील होडावडा, तुळस, पाल,अणसुर या भागातून जाणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
