मालवण (प्रतिनिधी) पर्ससीन मासेमारी परवाना नुतनीकरणाबाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येईपर्यंत कोणत्याही पर्ससीन नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरणाबाबत कोणतीही कार्यवाही करू नये असे आदेश रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त ना. वि. भादूले यांनी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व परवाना अधिकारी यांना दिले आहेत. मत्स्य विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार पर्ससीन नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण दि. ३१ मे २०२१ पर्यंत किंवा नव्याने गठीत करण्यात येणाऱ्या समितीच्या शिफारसी स्वीकार करेपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंत पर्ससीन मासेमारी परवान्यांचे नूतनीकरण करण्याबाबत दि. ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन अधिसूचनेनुसार उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र याबाबत दि. १ जून पासून पर्ससीन परवाने नूतनीकरण करण्याबाबत अद्यापही कोणत्या मार्गदर्शक सूचना वरिष्ठ कार्यालयामार्फत प्राप्त नाहीत. त्यामुळे पर्ससीन परवाना नूतनीकरण बाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येईपर्यंत कोणत्याही पर्ससीन नौकांच्या पर्ससीन परवान्यांचे नूतनीकरण बाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. भादूले यांनी दिले आहेत.
आदेश येईपर्यंत पर्ससीन नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश
