मालवण तालुक्यात पावसाची तुफानी बॅटिंग

नद्या नाल्याना पूर;झाडे कोसळली , घरांचेही झाले नुकसान

मालवण दि प्रतिनिधी गेले दोन दिवस मालवण तालुक्यात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने आजही तुफानी बॅटिंग करत मालवणला अक्षरशः झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गडनदीसह इतर नद्या नाल्याना पूर आला असून तालुका जलमय झाला आहे. तर पावसाच्या तडाख्यात काही ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले. आज सकाळपर्यंत मालवणात १३९ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या मालवण तालुक्याला गेले तीन दिवस नॉनस्टॉप मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आज दिवसभर पावसाने आपली मुसळधार सुरूच ठेवल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. मालवण शहरातील बहुतांशी रस्त्यावर पाणी भरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. गटारे तुडुंब भरल्याने तर काही ठिकाणी गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक आपापल्या परीने गटारे मोकळी करून पाण्याला वाट करून देत होते. यामुळे शहरातील गटार खोदाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत मालवण तालुक्यात १३९ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. तर आतापर्यंत तालुक्यात १७६३ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

You cannot copy content of this page