स्वतंत्र कोकण संघर्ष समितीची मागणी .
*💫कणकवली दि.०७-:* स्थानिक पातळीबरोबरच राज्य व राष्ट्रीय पातळीवर गोरगरिबांचे अश्रू पुसून उत्कृष्ट , शैक्षणिक , सामाजिक व राजकीय कार्य करणारे लोकनेते माजी खासदार कोकणचे सुपुत्र आदरणीय स्व .दि.बा. पाटील यांचे नाव पनवेल येथे उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे असे स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा . महेंद्र नाटेकर यांनी राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकारला आवाहन केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेची सभा पेन्शनर्स भवनमध्ये आयोजित केली होती . त्यावेळी प्रा . नाटेकर बोलत होते . यावेळी संघटनेचे पदाधिकारी संजय हंडोरे , प्रा . प्रकाश अधिकारी , मोतिराम गोठिवरेकर , ए.वाय , चिलवान सर , वाय. जी. राणे, जे. जे. दळवी इत्यादी उपस्थित होते. प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , मुंबईला पर्याय म्हणून १ ९ ७० साली राज्य सरकारने ठाणे व रायगड जिल्ह्यातील ऐरोली ते बेलापूर व उरण – पनवेल येथील ९ ५ गावठणातील शेतजमीन कोडी मोलाने खरेदी करण्यासाठी अधिसुचना जारी केली तेव्हा दि . बा . पाटील यांनी , ‘ जमीन – बचाव समिती ‘ स्थापन करुन जोरदार , संघर्ष केला . हजारो भूमिपुत्र त्यात सामील झाले . हा संघर्ष सुमारे दहा वर्षे सुरु होता . शेवटी १ ९ ८१ साली दर एकरी तीस हजार रुपये व संपादीत जमीनिपैकी एकरी साडे बारा टक्के विकसित जमीन , जमीन मालकाला देण्याचे मान्य होऊन त्यांची तत्काळ कार्यवाही करण्यात आली . त्याचा लाभ हजारो शेतकरी घेत आहेत . स्व. दि. बा. पाटील हे दूरदृष्टीचे नेते होते . त्यांनी १ ९६०-७० च्या दशकात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा – महाविद्यालये सुरु करुन विद्यार्थ्यांना स्वत : च्या पायावर उभे केले . १ ९ ५२ ते २००० च्या काळात त्यांनी कधी विधानसभा तरी कधी लोकसभेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व केले . संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते आघाडीचे नेते होते . बेळगाव सीमा प्रश्न आणीबाणी विरुद्ध लढ्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. इतर मागासवर्गास लाभदायक ठरलेल्या मंडल आयोगाच्या स्थापनेतही त्यांचे मोलाचे योगदान आहे . शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी प्रकल्प ग्रस्त तसेच तरुणांसाठी झटत राहिले . त्यांच्या जन्मभूमीत व कर्मभूमीतच विमानतळ उभारला जात असल्याने दि . बा . पाटील यांचेच नाव विमानतळाला देणे सर्वथैव उचित आहे , असे शेवटी प्रा.नाटेकर म्हणाले . नवी मुंबई येथिल विमानतळाला स्व . दि . बा . पाटील यांचेच नाव द्यावे असे ठाणे , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्गातील स्वतंत्र कोकण संघटनेच्या प्रतिनिधींनी जोरदार समर्थन केले . ए . वाय.चिलवान यांनी आभार प्रदर्शन केले .
