नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रयत्नांना यश
मालवण दि प्रतिनिधी मालवण शहराच्या प्रारूप सुधारित विकास योजनेमधील सारभूत स्वरूपाच्या बदलांबाबत प्रसिद्ध केलेल्या सूचनेवर नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर ८ व ९ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली सुनावणी स्थगित करण्याच्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलेल्या मागणीला सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी प्रतिसाद दिला आहे. ही सुनावणी स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक नगररचना सहसंचालकांनी दिले आहे. या मागणीसाठी आमदार वैभव नाईक यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोरोना संकट काळामुळे सदर सुनावणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार होती. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या तौक्ते वादळानंतर दूरसंचार तथा इंटरनेट प्रणाली विस्कळीत झाल्यामुळे तसेच पावसाळा चालू झाल्यामुळे तक्रारदारांना ऑनलाईन सुनावणीस हजर होण्याकरिता इंटरनेटच्या असुविधेमुळे अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच आपले म्हणणे मांडण्यास पुरेसा अवधी व संधी देखील न मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मालवण शहराच्या प्रारूप सुधारित विकास योजनेमधील सारभूत स्वरूपाच्या बदलांबाबत प्रसिद्ध केलेल्या सूचनेवर नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर ८ आणि ९ जुलै रोजी होणारी ऑनलाईन सुनावणी रद्द करून ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष उपस्थितीत ही सुनावणी घेण्याची मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली होती. या संदर्भात आ. नाईक यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला होता. याची दखल घेत आ. नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सूनावणीची पुढील तारीख मागाहून कळवण्यात येईल, असे पत्र नगररचना सहसंचालक जितेंद्र भोपळे यांनी दिले आहे.
