बांदा-शिरोडा मार्गावरील झुडपांची सफाई;वाहनचालकांसह नागरिकांत समाधान
*💫बांदा दि.०८-:* बांदा शिरोडा मार्गावरील झुडपांकडे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक अपघात घडले आहेत. याची दखल घेत शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन अखेर झुडपांची सफाई सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. आठ दिवसांपूर्वी पाडलोस केणीवाडा येथील सुजित परब यांच्या दुचाकीला झुडपांतून अचानक आलेल्या गव्या रेड्याची निसटती धडक बसली होती. परंतु पाठीमागून येणारे वाहनचालक समीर नाईक यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला होता. मडुरा पंचक्रोशीतील अनेक वाहनचालकांसह नागरिकांच्या तक्रारी सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांच्याकडे आल्या. अपघात टाळण्यासाठी श्री.शेटकर यांनी याची तात्काळ दखल घेत थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (सावंतवाडी) यांनाच झुडपे न तोडल्यास आंदोलनाचा इशारा दिला. अन अवघ्या काही दिवसातच झुडपांची सफाई सुरू झाल्याने सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे. *झुडपे तोडली पण खड्ड्यांचे काय?* बांदा शिरोडा मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांसह प्रवाशांना सुद्धा कसरत करावी लागत आहे. वारंवार खड्डे दुरुस्ती केले तरी काही ठिकाणी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे गरजेचे असल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे खड्ड्यांचे काय असा सवाल केला जात आहे.