ग्रामस्थांत नाराजी
*💫मालवण दि.३०-:* मालवण तालुक्यातील देवली येथे सागरी महामार्गावर रस्त्यानजीक दरड कोसळल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असल्याने अशा स्थितीत मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलग पडलेल्या पावसामुळे देवली येथे अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. काही ठिकाणी प्रमुख रस्त्यावर दरड कोसळली होती. ही दरड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी हटवून रस्ता मोकळा केला होता. मात्र, रस्त्यालगत असलेल्या खोल दरीच्या बाजूने असलेली दरड कोसळल्याने रस्त्यालाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सागरी महामार्गवरून नेहमी वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याने पुन्हा दरड कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघात होऊ नये, यासाठी बांधकाम विभागाकडून रस्त्यावर दगड लावण्यात आले आहेत. मात्र, रात्रीच्यावेळी याचा कोणताही फायदा होणार नाही. त्याठिकाणी रेडियमचे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. अन्यथा लोखंडी रेलिंग करून तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे, असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
