समीर गावडे, गुरुदास गवंडे यांची मागणी : अन्यथा २६ जानेवारी रोजी जनआंदोलन
*💫सावंतवाडी दि.०७-:* तालुक्यातील सोनुर्ली, वेत्ये आणि इन्सुली या गावांमध्ये असणाऱ्या काळया दगडांच्या खाणीवर करण्यात येणाऱ्या शक्तिशाली सुरुंग स्फोटामुळे निगुडे गावातील घरांना तडे जाऊन नुकसान झालेल्यांना भरपाई मिळण्याबरोबरच गावातून होणाऱ्या ओव्हरलोड खनिज वाहतुकीमुळे रस्ते मोऱ्यांची झालेली खेळणी खनिकर्म विभागाकडून दुरुस्ती करून मिळावी, अशी मागणी सरपंच समीर गावडे व उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली असून याबाबत तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जनआंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला आहे. दगड खाणी वरील सुरुंग स्फोटामुळे निगुडे गावातील १५६ घरांना तडे गेले आहेत. संबंधितांचे तब्बल २१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, याबाबत सावंतवाडी महसूल अधिकारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी सर्वे करून झालेल्या नुकसानीचे व्हॅल्युएशन केले आहे तशी पंचा यादीही घालण्यात आली आहे मात्र वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नाही. सध्य परिस्थितीत शासनाचे नियम व अटींचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात अजूनही ब्लास्टिंग सुरू आहे तसेच नवीन खाणींना ही परवानगी देण्यात आलेली आहे. याबाबत योग्य ते आदेश प्रशासनाला द्यावेत ओव्हरलोड खनिज वाहतुकीमुळे गावातील रस्ते मो-या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे गावातून जाणाऱ्या ओव्हरलोड गणेश वाहतुकीला निर्बंध घालून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. तसेच खनिकर्म विभागाच्या निधीतून दुरुस्त करण्यात याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे. यात परिसरात होणाऱ्या खनिज उत्खननाचे सर्वेक्षण करून नियमबाह्य उत्खननावर कारवाई करण्यात यावी उत्खननासाठी नेमकी किती परवानगी दिली आहे.त्याची मर्यादा तपासण्यात यावे. पर्यावरण विभागाचा अहवाल तपासण्यात द्यावा व संबंधित नुकसान झालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.