फळविक्रेत्या तरूणाने गळफास घेत जीवन संपविले

*💫कणकवली दि.२६-:* कणकवली-पटकीदेवी मंदिरानजीक राहणारा किशन शंकर भामंद्रे (26, मूळ गाव बुलढाणा) या फळविक्रेत्या तरूणाने शनिवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास घरात कुणी नसताना वाशाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्या वेदना सहन होत नव्हत्या. भामंद्रे कुटुंबिय गेल्या पाच वर्षांपासून कणकवलीत फळविक्रीचा व्यवसाय करतात. जानेवारी महिन्यात किशन भामंद्रे याला जानवली पूलानजीक अपघात झाला होता. त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र उपचारानंतरही त्याच्या पायाच्या वेदना असह्य होत होत्या. शनिवारी सकाळी त्याची आई, त्याचा लहान भाऊ, पत्नी आणि तीन मुले असे कुटुंबिय बुलढाणा येथे घरी जाण्यासाठी निघाले होते, त्यामुळे किशन घरी एकटाच होता, तर दुसरा भाऊ घरात नव्हता. दुपारी त्याचा भाऊ गणेश भामंद्रे याला घराचा बाहेरचा दरवाजा बंद होता, म्हणून मागील दरवाजाने आत जाऊन पाहिले असता लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली होती. याबाबत त्याने कणकवली पोलिसांनी खबर दिल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात करत आहेत.

You cannot copy content of this page