४ ऑक्सिजन काँसेंट्रेटर, २ जनरेटर, ऑक्सिजन ऑन व्हील व्हॅन लोकसेवेसाठी सज्ज
*💫कणकवली दि.२६-:* सावंत फौंडेशन, कळसुली आणि रोटरी क्लब ऑफ क्विन्स नेकलेस यांच्या संयुक्त उपक्रमातून ४ ऑक्सिजन काँसेंट्रेटर २ जनरेटर आणि सोबत सुसज्ज ऑक्सिजन ऑन व्हील व्हॅन तात्पुरत्या परतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा शुभारंभ जिल्हा उप रुग्णालय कणकवली येथे डॉ. शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पत्रकार शेखर सामंत, तालुका वैद्यकीय अधिकारी,डॉ. संजय पोळ, डॉ. तुळशीराम रावराणे, सावंत फौंडेशनचे प्रकल्प नियोजक सुनील सावंत, प्रोजेक्ट कोऑरर्डीनेटर श्रेयश मुरकर, सहाय्यक सुनील हरड यांच्या उपस्थितीत पार पडला. पंचक्रोशीतील दहा गावांना लिक्विडसोप, फिनाईल, सॅनिटायझर, इतर क्लीनिंग साहित्य मदत स्वरूपात देण्यात आले. वाडवडिलांच्या आशीर्वादाने आणि कुटुंबियांच्या सहकार्याने सावंत फौंडेशनचे कार्य अविरत चालू आहे . सावंत फौंडेशनने यावर उपाय म्हणून ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. समाज सेवा आणि विध्यार्थी मित्रांशी जुळलेली नाळ सहजासहजी दूर जाऊ शकत नव्हती. याच काळात शिक्षणापासून, अभ्यासापासून वंचित, दूरावल्या गेलेल्या मुलांना मार्गदर्शनासाठी सुरवात केली. बघता बघता मार्गदर्शनावरील पंचविस वेबिनार झाले. मुलांनी देखील खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि मग ऑनलाईन शाळा सुरू झाली. मुलांना वेबिनार आणि शाळा दुहेरी बोजा देणे योग्य नव्हते म्हणून वेबिनार बंद केले. योगा दिवस, पंढरीची वेबिनारवारी याही विषयाला हात घालत लोकांची कोरोना काळातील मनस्थिती आणि मनोधैर्य वाढविण्यास या कार्यक्रमामुळे एकप्रकारे मदत झाली, असे सावंत फाऊंडेशनचे सेक्रेटरी शरद सावंत म्हणाले. संपूर्ण बंदीच्या काळात हातावर पोट असलेल्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब लोकवस्तीत सावंत फाऊंडेशनमार्फत अन्नवाटप करण्यात आले. खारघर, नेरुळ, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तांदूळ, गव्हाचं पीठ, डाळ, मसाला, तेल, मीठ पॅकेट बनवून साधारण पंधरा दिवस पुरेल असे अन्नदान सावांत फाऊंडेशन मार्फत करण्यात आले. दिवसागणिक रुग्ण वाढतायत या गोष्टीचा विचार करून सावंत फौंडेशन आणि “रोटरी क्लब ऑफ क्विन्स नेकलेस” मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून ४ ऑक्सिजन काँसेंट्रेटर, 2जनरेटर आणि सोबत सुसज्ज ऑन व्हीलव्हॅन आमच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सहित उपलब्ध करून या कठीण परिस्थितीवर मात करायला सावंत फौंडेशन सज्ज झालं. हे उपयुक्त साहित्य सावंत फौंडेशनकडे ठेवून अधिकृत ग्राम पंचायत आणि शासनमान्य डॉक्टरांच्या सल्ल्याने पेशंटना तात्पुरत्या स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिलं जाईल. कळसुली, पोखरण, आंब्रड, शिरवल, शिवडाव आणि कळसुलीच्या आजू बाजूच्या पंचक्रोशीतील गावांना लिक्विड सोप, फिनाईल, सॅनिटायझर, परिसर सॅनिटायझेशन करण्यास सॅनिटायझर असं उपयोगी साहित्याचे वाटप सावंत फाऊंडेशनने केले. सिंधुदुर्गातील इतर तालुक्यातील गावांतील अत्यावश्यक पेशंटनासुद्धा याचा लाभ उपलब्दते नुसार दिला जाईल. गरजूंनी दिलेल्या गुगल फॉर्मवर अर्ज करून ग्रामपंचायती मार्फत संपर्क साधायचा आहे, असे सावंत फाऊंडेशनचे सेक्रेटरी शरद सावंत यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी खालील नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर- श्रेयश मुरकर -9405724456 सहाय्यक- संतोष मुरकर-9405222110 सह सहाय्यक – सुनील हरड 9404395097 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
