*जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली माहिती
*💫सावंतवाडी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या उद्या ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली. प्रसिध्दीपत्रकात गावडे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी आणलेले शेतकरी व शेतमजूर अडचणीत आले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने अमलात आणलेल्या शेतकरी विधेयकामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनच नष्ट होणार आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव व बाजारभाव सुदधा मिळणार नाही. कामगार, मजूर आडते, मुनीम, हमाल यांच्यासह लाखो लोक बेरोजगार होणार आहेत. शिवाय बाजार व्यवस्था मोडीत निघताच राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे राज्याचे उत्पन्न कमी होउन त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण व शेती विकासावर होणार आहे.या विधेयकामध्ये साठेबाजीला आळा घालणारा कायदा नसल्याने मूठभर व्यापारी साठेबाजी करणार व बाजार तेजीत येताचतो विकून भरपूर नफा मिळवणार, तसेच जमीन कसणारा बटाइने शेती करणारा व मजूर यांना या कायदयात कोणतेही संरक्षण नसल्याने हा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर घाला घलणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवून फसवणूक केली जाण्याचा मोठा धोका आहे. म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या आंदोलनाला पाठींबा दिल्याचे गावडे यांनी सांगितले.