*💫सावंतवाडी दि.२४सहदेव राऊळ-:* मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती स्त्रियांचा वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना नियमावलीचे पालन करण्यात आले. सौभाग्यवती स्त्रियांच्या महत्वाच्या सणांपैकी वटपौर्णिमा हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पती-पत्नीच्या नात्यातील स्नेहबंध दृढ करणारा असा हा सण मळगाव तेलकाटावाडी येथे उत्साहात साजरा करण्याता आला. यावेळी येथील सुहासिनी महिलांनी एकत्र येत वडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना वडाजवळ केली. यावेळी महिलांनी वडाला दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या. सर्व महिलांनी कोरोनापासून सर्वांचे रक्षण कर, असे गाऱ्हाणेही वडाजवळ घातले. पूजेनंतर महिलांनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे हळद-कुंकू लावले. वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू झाली होती. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांनी काल व आज सकाळी गर्दी केली होती. आंबे, हळदी-कुंकू, दोरा, अननस, फणस, सफरचंद, इतर फळे आदी सणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी सकाळी मोठी वर्दळ सुरू होती. मळगाव येथे इतर वाडीतील महिलांनी वटपौर्णिमा सण साजरा केला.
मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा
