बांदा – दोडामार्ग रस्त्यांवर गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागाकडून कारवाई; दारुसह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

*💫बांदा दि.२४-:* राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाकडून आज पहाटे बांदा – दोडामार्ग रस्त्यावर बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीवर कारवाई करण्यात आली असून, यात तब्बल २ लाख ११ हजार २०० रुपयांच्या दारुसह १ लाखांची कार असा एकूण ३ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश कृष्णा नार्वेकर (३०, रा. माणगाव, मळावाडी, ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. गोव्यातून सिंधुदुर्गात दारु वाहतूक होणार असल्याच्या खात्रीलायक माहितीनुसार बांदा – दोडामार्ग मार्गावर निरीक्षक एस. के. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता. तपासणी नाक्यावर गुंगारा देत चोरवाटेने आलेली अल्टो कार (एमएच ४३ व्ही ९२५४) तपासली असता त्यात विविध ब्रँडचे ४४ दारुचे बॉक्स आढळून आल्याने कार व दारु ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी याच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. के. दळवी, जवान आर. डी. ठाकूर, डी. आर. वायदंडे, चालक आर. एस. शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक एस. के. दळवी करीत आहेत.

You cannot copy content of this page