जोपर्यंत ओबीसिंच्या राजकीय आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही

भाजपाच्या प्रांतिक सदस्या चित्रा वाघ यांचा कुडाळ येथील पत्रकार परिषदेत इशारा

कुडाळ प्रतिनिधी:- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असल्याची जोरदार टीका भाजपाच्या प्रांतिक सदस्या चित्राताई वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर करीत जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुर्वव्रत होत नाही तो पर्यंत भाजपाच्या वतीने दि. 26 जुन पासुन राज्यभर एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा राज्य सरकारला दिला. तसेच ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणार्या मागासवर्गीय आयोगाच्या फाईलीवर गेले 15 महीने झाले तरी मुख्यमंत्री यांनी स्वाक्षरी केली नसल्याचा आरोप ही केला. कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा दौर्यावर आलेल्या चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रांतिक सदस्य अतुल काळसेकर, जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिपक नारकर, भाजपा नेते राजू राऊळ, तालुकाध्यक्ष विनायक राणे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, गजानन वेंगुर्लेकर, राकेश कांदे, रेखा काणेकर, श्रीपाद तवटे, बंड्या सावंत, बंड्या मांडकुलकर, रेखा काणेकर तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वाघ यांनी सांगितले की, आमच्या फडणवीस सरकारने मिळविलेले मराठा आरक्षण ज्या प्रमाणे या सरकारने घालविले त्याचप्रमाणे आता या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षणही रद्द झाले. 2019 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या आरक्षणा संदर्भात दोन महिने मुदतवाढ घेतली होती. त्यानंतर सरकार बदलले त्यामुळे आताच्या सरकारने मागासवर्ग आयोग बनवून अहवाल न्यायालयाला सादर करणे आवश्यक होते. मात्र गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत या सरकारने कोणत्याही प्रकारची कार्यवाही ओबीसी राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी केलेली नाही. या उलट मंत्री आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू पाहत असुन या पेक्षा त्यांनी विधीमंडळात बसुन या बाबत कार्यवाही करावी असा सल्ला दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर चा रक्षणासाठी मागासवर्ग आयोग बनवावा अशी मागणी विधानसभेत केली होती. तसेच या संदर्भातील समितीने ही फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्यवाही करावी असे राज्य सरकारला सुचविले मात्र मुख्यमंत्री यांनी आरक्षणा संदर्भात दुर्लक्ष केले त्याच मुळे हे आरक्षण रद्द झाले असल्याचा आरोप वाघ यांनी केला. चौकड:- पंधरा महिने मुख्यमंत्र्यांकडेच फाईल पडून- चित्रा वाघ मागासवर्ग आयोग गठीत संदर्भात असलेली फाईल मुख्यमंत्री कार्यालयात गेले पंधरा महिने पडून आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली नाही असाही आरोप चित्राताई वाघ यांनी केला. आरक्षण पुन्हा पूर्ववत व्हावे या करीता दि. 26 जून पासून राज्यात 1 हजार ठिकाणी चक्का जाम आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जो पर्यंत आरक्षण पुर्वव्रत होत नाही तो पर्यंत राज्यात कोणत्याच निवडणूका होवु देणार नाही तसेच कोणत्याही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा ही वाघ यांनी दिला. यावेळी बोलताना राजन तेली यांनी सांगितले की आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यातील एकूण 69 हजार जणांना याचा फटका बसणार असल्याने ते सर्व मुख्य प्रवाहातून बाजूला फेकले जाणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनेच्या नेत्यांशी त्यांनी बैठक घेतली. तर अतुल काळसेकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यात येणार्या आंदोलना संदर्भात 3 टप्प्यांत नियोजन केले असुन पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय, दुसऱ्या तालुकास्तरीय व तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक वाडीवर बैठका घेण्यात येणार असून दि. 26 जुनला सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथील सिडको कार्यालयाच्या ठिकाणाहून आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page