ओसरगावातील वीजप्रश्नी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांची धडक
*💫कणकवली दि.२२-:* ओसरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा आठ दिवसात सुरळीत व्हावा. सदर वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या उद्रेकास आपली यंत्रणा जबाबदार राहील, असा इशारा ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ओसरगाव ग्रामपंचायत हद्दीतील लाईट वारंवार येत जात असते. कानसळीवाडी ते गोडाऊन परिसर आणि गावठणवाडीमध्ये व्होलटेज कमी असून ग्रामस्थांची वीज उपकरणे खराब होतात. आपल्याला वारंवार कल्पना देऊनही आपल्या स्तरावरुन वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यासंदर्भात मोहिते यांची भेट घेत हे निवेदन सादर करण्यात आले. तसेच गावातील बंद वीज मीटर बदलण्याची मागणी ही तावडे यांनी केली. त्यावर मोहिते यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून येत्या आठ दिवसात यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात बोलावून घेत मोहिते यांनी सूचना दिल्या. यावेळी उपकार्यकारी अभियंता संतोष नलावडे उपस्थित होते. तर ग्रामस्थांमधून सदानंद मोरे, नितीन धुरी, दिनेश अपराज, महेश वारंग, विवेक परब, मंगेश आलव, दत्तात्रय परब आदी उपस्थित होते.
