पोलिसांची करडी नजर असतानाही बाटल्या सापडल्याने व्यक्त केलं जातं आहे आश्चर्य*
*💫मालवण दि.१७-:* मालवणच्या पर्यटनाचे एक प्रमुख अंग असलेल्या आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या रॉक गार्डन येथील खडकाळ किनाऱ्यावर सध्या बियरच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. या बाटल्या कुठुन आल्या किंवा याठिकाणी रात्रीच्या वेळी पार्ट्या रंगतात का असा सवाल निर्माण होत असून नजीकच पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत असून पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या परिसरावर पोलिसांची करडी नजर असतानाही मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मालवण पोलीस ठाण्याच्या नजीक समुद्र किनारी असणारा खडकाळ किनारी परिसर नेहमी पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. याठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून रॉक गार्डन उभारल्यानंतर हा परिसर पर्यटनाचे प्रमुख अंग बनला आहे. मात्र या किनाऱ्यावर नेहमीच प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे आवरण, इतर प्लास्टिक कचरा, जुनी चप्पले, कपडे आदी प्रकारचा कचरा खकडात अडकून पडल्याचे दिसून येते. तसेच समुद्रातून लाटांद्वारे वाहून येणाऱ्या तुटलेल्या मच्छीमारी जाळी, प्लास्टिक बॉटल्स, थर्माकोल आदी कचराही या खडकात येऊन साचल्याचे दिसून येतो. या खडकात बियरच्या बाटल्यांचे प्रमाणही भरपूर दिसून येते. पर्यटन स्थळ असूनही हा खडकाळ किनारी भाग स्वच्छतेपासून नेहमीच वंचित राहिला आहे. या पार्श्वभूमीवर याच खडकाळ परिसरात एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरील बियरच्या बाटल्यांचा खच पडल्याचे निदर्शनास आले आहे. या बाटल्या कोणी आणून टाकल्या आहेत की याठिकाणी रात्रीच्या वेळी बियर पार्टी रंगली का ? असा सवाल यानिमित्ताने सुरू होत आहे. रात्रीच्या वेळी काळाकुट्ट अंधार असणाऱ्या या परिसरातील हालचालींवर नजर ठेवणे महत्वाचे बनले असून जवळच असणाऱ्या पोलीस ठाण्याने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. तसेच या परिसराची स्वच्छता होणेही पर्यावरणाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
