…अन्यथा आम्ही सोनवडे घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या करणार

प्रा .महेंद्र नाटेकर यांचा शासन-प्रशासनाला इशारा

*💫कणकवली दि.१७-:* बेजबाबदार राज्यकत्यांनी गेली 40 वर्षे रेंगाळत राहिलेले सोनवडे घाटमार्गाचे काम त्वरित सुरु करा , अन्यथा आम्ही सोनवडे – घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या करणार , असा निर्वाणीचा इशारा शासन – प्रशासनाला देत आहोत . असे सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर म्हणाले . सोनवडे येथे सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीची सभा आयोजित केली होती.त्यावेळी प्रा.नाटेकर बोलत होते . यावेळी सत्यवान ढवळ , गणेश बुराले , विलास सदडेकर , दाजी तवटे , शरद गुरव , संजय पवार , भिवा घाडीगांवकर , संतोष घाडीगांवकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते . प्रा.नाटेकर पुढे म्हणाले . पावसाळ्यात फोंडा , करुळ , आंबा , आंबोली घाटमार्गाच्या दरडी कोसळून शेकडो लोक मृत्यूमुखी पडले तर हजारो लोक अपंग झाले आहेत . हे टाळण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात सर्वाधिक सोपा असलेला घोटगे सोनवडे घाटमार्ग करावा म्हणून गेली चाळीस वर्षे आंदोलने करीत आहोत . हा घाटमार्ग झाल्यानंतर हजारो लोकांचे प्राण वाचतील . इंधन वाचेल , वेळ वाचेल कारण ह्या मार्गाने पंचवीस – तीस किलो मिटर अंतर कमी होते . घाटमार्गासाठी केलेल्या आंदोलनानंतर घाटमार्गाचा सर्व्हे झाला.नंतर गारगोटी घोटगे – सोनवडे – पणदूर वेंगुर्ला मठ हायवे 1970 च्या दशकात मंजूर करण्यात आला . पण काही वर्षे काम सुरु झालेच नाही . म्हणून आमरण उपोषण , घेरावख धरणे , रस्तारोको , आत्महत्या इत्यादी आंदोलने केली.त्यामुळे घाटमार्ग करण्याच्या हालचाली सुरु झाल्या.जमीन संपादन , वनजमीन हस्तांतरण , वन्यप्राणी , संरक्षण , पर्यावरणाच्या बाबतीत डेहराडूनची परवानगी इत्यादी आवश्यक गोष्टींची शासनाने पूर्तता केली.आता घाटमार्गासाठी पैशाची आवश्यकता होती ती सुध्दा सोनवडे घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या करण्याच्या विचारात असतानाच बांधकाम खात्याने आशियायी फंडातून रक्कम मंजूर केली म्हणून आम्ही आमचे आत्महत्या आंदोलन तुर्तास स्थगित केले होते . आता घाटमार्गाचे काम सुरु करण्याची सर्व काही पूर्तता झाली असे समजून त्या मतदार संघातील आमदार – खासदारांनी लोकसभा – विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी घाई – गर्दीने घाटमार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला.त्यावेळी चार – आठ दिवसात घाटमार्गाचे कामकाज सुरु होईल . असे सर्वांना वाटले पण अद्यापी ते घाटमार्गाचे काम सुरु झाले नाही , म्हणून लोक संतप्त झाले आहेत . मंत्रालयातील सार्वजनिक बांधकामाचे सचीव श्री . डेबलवार यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन किलो मिटर घाटरस्त्यात अधिक चढ आहे . अवघड वाहतुकीस तो त्रासदायक होईल. आमचे म्हणणे असे आहे की सिंधुदुर्ग – कोल्हापूरच्या इंजिनियर्सना तो चढ किती असावा हे सुध्दा कळत नाही का ? चढ अधिक आहे असे डेबलवार यांना वाटत असेल तर तो प्रशासनाचा दोष आहे . तो दोष डेबलवार यांनी वरिष्ठ म्हणून त्वरित दूर करावा.जनतेला त्रास का ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या कामी लक्ष घालून सोनवडे घाटमार्गाचे काम त्वरित सुरु करण्याचे आदेश देऊन कार्यवाही करावी अशी विनंती आहे . शासन प्रशासनाला विनंती करणे अन्यथा आंदोलन करणे एवढेच आमच्या हाती आहे.तेच आम्ही गेली चाळीस वर्षे करीत आहोत . आताही घाटमार्गाचे काम त्वरित सुरु न केल्यास सोनवडे घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या आंदोलनाबरोबरचे पणदूर तिठा येथे महामार्गावर न भूतो न भविष्यवती असे रस्ता रोको आंदोलन जुलै महिन्यात करणार आहोत.हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे .असे प्रा. नाटेकर म्हणाले.

You cannot copy content of this page