जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
*💫सिंधूदुर्गनगरी दि.०५-:* कृषि विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या शेती प्रशिक्षणात सहभागी होवून बदललेले तंत्रज्ञान व शेती पूरक व्यवसाय याचे ज्ञान प्राप्त करावे. याद्वारे शेतकऱ्यांनी कृषि उत्पादनात प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर यानी तळगाव खांद येथील शेतीशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
महाराष्ट्र शासन क्रुषिविभाग व क्रुषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा-आत्मा अंतर्गत शुक्रवार ४ डिसेबर पासून मौजे तळगाव-खांद येथे शेतकऱ्यांसाठी नारळ शेतीशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्धघाटन माधुरी बांदेकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मालवण सभापती अजिंक्य पाताडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मालवण तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, तळगाव सरपंच अनंत चव्हाण उपस्थित होते. या शेती शाळेत नारळ पिका विषयी लागवड ते काढणी पश्चात विविध बाबींवर दहा दिवस पंधरा दिवसाच्या अंतराने प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना सभापती पाताडे यानी कोरोना सारख्या महामारिच्या काळात टिकून राहणारा घटक म्हणजे शेतकरी होय. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढ होऊन उत्पादनातही वाढ झाल्याचे आवर्जून सांगितले. जिल्हा परिषद सदस्य साटविलकर यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे असे सुचित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी कृषि पर्यवेक्षक धनंजय गावडे यानी केले. कृषि सहाय्यक श्रीम. अमृता भोगले यांनी खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या भात पिक प्रात्यक्षिक उत्पन्नाचे आकडेवारी विषद केली. तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास होणाऱ्या प्रगती बाबत माहिती दिली. यावेळी मालवण तालुका आत्मा व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि मित्र श्रीम.लता खोत, ग्राम पंचायत सदस्य व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.