लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावा : वाहनधारक व मळगाव ग्रामस्थांमधून मागणी
*💫सावंतवाडी दि.०५ सहदेव राऊळ-:* अचानक सुरू झालेल्या मायनिंगच्या डंपरमुळे मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना व मळगाव बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत आहे. डंपरची सतत ये-जा असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मळगावातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक व मळगाव ग्रामस्थांमधून होत आहे. तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात मायनिंगला सुरूवात झाली आहे. हे मायनिंग डंपर मळगावमार्गे ये-जा करत असतात. मळगाव बाजारपेठेतून मुख्य मार्ग जात असल्याने या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सकाळच्या व सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात असते. हे डंपर सोडण्यासाठी कोणी गार्ड मायनिंग कंपनीकडून अद्याप ठेवण्यात आला नसल्याने डंपर चालक एका पाठोपाठ एक वेगाने डंपर हाकत आहेत. त्यामुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविली जात आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यावा तसेच मायनिंग कंपनीने आपला गार्ड या ठिकाणी ठेवावा, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.