नगरसेवक सुदेश आचरेकर यांची मागणी
मालवण दि प्रतिनिधी सध्या मालवणात भर पावसात गटार खोदाई सुरू असून या गटार खोदाईवर नगरपालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने निकृष्टपणे चाललेल्या या गटार खोदाईला आपला पूर्णपणे विरोध असून संबंधित ठेकेदारावर नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारावा आणि ऑडिट झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे गटार खोदाईचे बिले मंजूर करू नये अशी मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक श्री. सुदेश आचरेकर यांनी केली आहे. ऐन पावसाळ्यात मालवण शहरात सध्या गटार खोदाई सुरू असून या गटार खोदाई बाबत आज मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी पत्रकारांसमोर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, मालवण शहरात गटार खोदाई सुरू असून अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही गटार खोदाई केली जात आहे. वस्तुतः पावसाळ्या पूर्वी किंबहुना एप्रिल मे महिन्यात गटार खोदाई करणे गरजेचे होते. मात्र यावर्षीच्या गटार खोदाई बाबत नगराध्यक्षांसहित नगरपालिका प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नाही त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची ज्या प्रमाणे तुंबापुरी झाली तशीच पावसाळ्यात मालवण शहरावर परिस्थिती ओढावणार आहे. मालवणात जी गटार खोदाई केली जात आहे त्यात सुमारे अडीच ते तीन फूट गटाराची खोदाई करणे गरजेचे होते मात्र, सध्याची गटार खोदाई बघितल्यास ठेकेदार गटारातील फक्त वरवरच्या असणाऱ्या कचऱ्याचा उपसा करीत आहे त्यात पालापाचोळ्याचाही समावेश आहे. पालापाचोळा मिश्रित ही माती गटाराच्या वर काढून ठेवण्यात आल्याने ती पुन्हा गटारात पडून गटारे होरली जाणार आहेत. मालवण शहरातील व्हाळ्या तर अद्याप साफ केल्या गेल्या नसल्याने जागोजागी पाणी तुंबण्याचा प्रकार नजिकच्या काळात घडणार आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात मालवण शहरात जागोजागी पाणी तुंबण्याचे प्रकार वाढीस लागणार असून नगराध्यक्षांसहित मुख्याधिकाऱ्यांनी मालवण शहरात जी गटारे खोदली जात आहेत त्याची पाहणी करावी. या गटार खोदाईत संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालू नये अशी अपेक्षाही श्री. सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केली आहे.
