विजय केनवडेकर यांची मागणी
मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी कोरोना तपासणी १५ जूनपर्यंत करणे बंधनकारक असल्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मात्र व्यापाऱ्यांसाठी ही कोरोना तपासणी ऐच्छिक करावी, अशी मागणी भाजपच्या उद्योग, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे आवश्यक आहे. पण ज्या व्यापारी बांधवाना ताप, सर्दी, खोकला किंवा परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आहे किंवा होऊन गेला आहे, यांची तपासणी बंधनकारक करावी. ज्या व्यापाऱ्यांचे टेपरेचर जास्त असेल त्यांचीच कोरोना तपासणी करावी. गेल्या महिन्यात प्रशासनाने सर्व व्यापारी व कर्मचारी यांच्या कोरोना तपासणीच्या दिलेल्या आदेशाचे पालन करुन तपासणी केली होती. असेच सहकार्य जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रशासनाला देत आहेत पुढेही देत राहणार आहेत. तसेच व्यापारी बांधवाना कोरोना लसीकरणासाठी वेगळी व्यवस्था करुन देण्यात यावी, अशी मागणी श्री. केनवडेकर यांनी केली आहे
