रणजीत देसाई यांचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना साथीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद करून जिल्हा प्रशासनाला मागच्या दाराने कारभार सुरू ठेवण्याची वेळ आली असल्याची टीका भाजपा जिल्हा परिषद सदस्य गटनेते रणजित देसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुकाने, बाजार पेठा सुरू होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय मात्र अनलॉक झाले आहे. या कार्यालयाचे मुख्य दरवाजासह सर्व दरवाजे बंद केल्याने या कार्यालयात येणाऱ्या अपंग बांधवांचे हाल होत असून याकडे ऑनलाईन पत्रकार परिषदेत पत्रकारांनी लक्ष वेधले असता रणजित देसाई म्हणाले की, पलकांत्र्यांच्या ज्या प्रमाणे मनमानी कारभार सुरू आहे. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार मागच्या दाराने चालू आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून ही साथ रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद करण्याची वेळ आली आहे. ही जिल्ह्यासाठी शोकांकीता आहे.दरवाजे बंद करून कोरोनावर मात करता येणार नाही.शासकीय कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक दरवाजा शोधताना अनेक कार्यालयाच्या संपर्कात येत आहे.यामुळे आणखी भीती निर्माण झाली आहे.जिल्हा प्रशासनाने दरवाजे बंद करून कोरोना रोखण्या पेक्षा सर्व सामान्य नागरिक ,दिव्याग याना वेठीस धरले असल्याची टिका रणजीत देसाई यांनी केली आहे. यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, लवकरच जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञ यांची बैठक घेतली जाणार असून लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच पहिल्या लाटेतून बाहेर आल्यावर ज्या उपाययोजना आखल्या पाहिजे होत्या त्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने न राबविल्याने जिल्हावासियांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
